मुंबई : बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन दर रविवारी मुंबईतील जुहू येथील ‘जलसा’ या निवासस्थानाबाहेर जमलेल्या चाहत्यांची भेट घेतात. अनेक वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा त्यांनी याही रविवारी कायम ठेवली. मात्र, यावेळी अमिताभ बच्चन यांनी चाहत्यांना पारदर्शक संरक्षक काचेच्या चौकटीतून अभिवादन केले. सुरक्षेच्या दृष्टीने ही अतिरिक्त व्यवस्था करण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

अमिताभ बच्चन यांची एक झलक पाहण्यासाठी त्यांच्या निवासस्थानाबाहेर शेकडो चाहते जमले होते. नेहमीप्रमाणे घराबाहेर येऊन चाहत्यांना अभिवादन करण्याऐवजी यावेळी ते पारदर्शक संरक्षक चौकटीत उभे राहिले. त्यांनी हात उंचावून चाहत्यांना आपल्या खास शैलीत प्रतिसाद दिला. यावेळी त्यांचा मुलगा आणि अभिनेता अभिषेक बच्चनही त्यांच्यासोबत होता. अमिताभ बच्चन चाहत्यांना अभिवादन करत असताना अभिषेक त्यांच्या मागे उभा राहून गर्दीवर लक्ष ठेवत होता. परिसरात सुरक्षारक्षकही तैनात होते. ऑक्टोबरमध्ये अमिताभ बच्चन यांच्या निवासस्थानाला लक्ष्य करून बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी देणारा ई-मेल मुंबई पोलिसांना मिळाल्याचे वृत्त समोर आले होते. त्यानंतर ही अतिरिक्त सुरक्षा व्यवस्था करण्यात आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
https://www.instagram.com/reel/DfNCxlMxvD6/?utm_source=ig_web_copy_link&srtk=MWQ1ZGUxMzBkMA==
बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर सुरक्षेत वाढ
गेल्या आठवड्यात शुक्रवारी अमिताभ बच्चन यांच्या मुंबईतील निवासस्थानाला लक्ष्य करणारा कथित धमकीचा ई-मेल मुंबई पोलिसांच्या निदर्शनास आला होता. मुंबईतील वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) परिसरातील एका शाळेला हा ई-मेल मिळाल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला.दरम्यान, अमिताभ बच्चन यांनी बुधवारी आपल्या ब्लॉगवर प्रकृतीबाबत पोस्ट शेअर केल्याने चाहत्यांमध्ये चर्चा सुरू झाली. डॉक्टरांनी विश्रांती घेऊन प्रकृती सुधारण्याचा सल्ला दिल्याने नेहमीचे सोशल मीडिया अपडेट्स काही काळ थांबवणार असल्याचे त्यांनी सांगितले. शुक्रवारी त्यांनी आपल्या टम्बलर अकाउंटवर आणखी एक पोस्ट शेअर केली. त्यात त्यांनी आणखी विश्रांतीची गरज असल्याचे नमूद केले. मानवी शरीराची वैशिष्ट्ये आणि त्यातील बदल याबाबत विचार करत असल्याचेही त्यांनी पोस्टमध्ये म्हटले.







