गारगोटीत खळबळ; संशयित प्रियकर स्वतःहून पोलिसांत हजर, चौकशीत गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती
कोल्हापूर : लग्न ठरल्याने प्रेमसंबंध संपवण्याचा निर्णय घेतलेल्या तरुणीला नाईकवाडी धबधब्याच्या कड्यावरून दरीत ढकलून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना भुदरगड तालुक्यात घडली. तरन्नुम बशीर नाईक (वय २३, मूळ रा. पाटगाव, सध्या रा. शिवाजीनगर, गारगोटी) असे मृत तरुणीचे नाव आहे. शुक्रवारी (दि. ९) ही घटना घडली. याप्रकरणी तिचा प्रियकर श्रीपाद दिनकर वडर (वय २५, रा. गारगोटी) याच्यावर खुनाचा आरोप आहे. घटनेनंतर संशयित स्वतःहून भुदरगड पोलिस ठाण्यात हजर झाला. चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेमुळे गारगोटीसह संपूर्ण भुदरगड तालुक्यात खळबळ उडाली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तरन्नुम आणि श्रीपाद यांच्यात गेल्या साडेपाच वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोघेही गारगोटीतील शिवाजीनगर परिसरात राहत असल्याने त्यांची ओळख झाली होती. तरन्नुम महागाव येथील अभियांत्रिकी महाविद्यालयात बीईचे शिक्षण घेत होती. शुक्रवारी सकाळी श्रीपाद तिला फिरायला जाण्याच्या बहाण्याने नाईकवाडी धबधबा परिसरात घेऊन गेला. तेथे कड्यावर असताना तरन्नुमने आपले लग्न ठरल्याचे सांगितले. त्यामुळे यापुढे प्रेमसंबंध सुरू ठेवता येणार नसल्याचेही तिने स्पष्ट केले. यावरून दोघांमध्ये वाद झाला. या वादातून श्रीपादने तिला कड्यावरून दरीत ढकलल्याचा आरोप आहे.

सुमारे ५०० फूट खोल दरी आणि परिसरातील कठीण भौगोलिक परिस्थितीमुळे तरुणीचा शोध घेण्याचे काम आव्हानात्मक ठरले. घटनेनंतर संशयित स्वतःहून पोलिसांसमोर हजर झाल्याने प्रकरणाला वेगळे वळण मिळाले. या प्रकरणाचा पुढील तपास भुदरगड पोलिस करत आहेत. तरन्नुमच्या मृत्यूप्रकरणी संशयितावर खुनाचा गुन्हा दाखल करून कठोर कायदेशीर कारवाई करावी आणि पीडित तरुणीला न्याय मिळवून द्यावा, अशी मागणी मुस्लिम समाजबांधवांनी केली आहे.






