कोल्हापूर : हातकणंगले तालुक्यातील माणगाव येथे सांस्कृतिक भवनासमोरील मंदिर परिसरात १५ वर्षीय शालेय विद्यार्थिनीचा धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना शनिवारी रात्री सुमारे नऊच्या सुमारास घडली. या घटनेमुळे माणगाव परिसरात खळबळ उडाली असून गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. घटनेनंतर संशयित आरोपी फरार झाला असून पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. मृत विद्यार्थिनी नववीच्या वर्गात शिकत होती. शनिवारी रात्री संशयित आरोपीने मंदिर परिसरात तिला गाठून धारदार शस्त्राने तिच्यावर वार केले. या हल्ल्यात तिच्या गळ्यावर आणि दंडावर गंभीर जखमा झाल्या. गळ्यावरील वार वर्मी बसल्याने तिचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे.

हल्ल्याचा आवाज ऐकून परिसरातील नागरिक घटनास्थळी धावले. त्यांनी जखमी विद्यार्थिनीला तातडीने इचलकरंजी येथील आयजीएम रुग्णालयात दाखल केले. मात्र, तपासणीनंतर डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच हातकणंगले पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तपासासाठी विशेष पथकही पाचारण करण्यात आले. पोलिसांकडून घटनास्थळाची तपासणी करण्यात येत असून, संशयित आरोपीचा शोध घेण्यासाठी रात्री उशिरापर्यंत शोधमोहीम राबविण्यात आली. या घटनेमुळे माणगाव परिसरात भीती आणि संतापाचे वातावरण असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.






