कोल्हापूर : चालू गळीत हंगामात गाळप होणाऱ्या उसाला प्रतिटन एकरकमी ३,८०० रुपये पहिली उचल देण्याची तयारी जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी दर्शवली आहे. कारखानदारांनी तसा प्रस्ताव दिला असून, तो शेतकरी संघटनेला मान्य नसल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले. साखरेचे दर आगामी काळात प्रतिक्विंटल ४,५०० रुपयांवर स्थिर राहिल्यास अतिरिक्त हप्ता देण्याची तयारीही कारखानदारांनी दर्शवली आहे. उसाच्या पहिल्या उचलीवरून कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांतील ऊस गळीत हंगाम ठप्प झाला आहे. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली यापूर्वी दोन बैठका झाल्या आहेत. मात्र, अद्याप तोडगा निघालेला नाही. शेतकरी संघटना प्रतिटन ४,५०० रुपये पहिली उचल आणि हंगाम संपण्यापूर्वी आणखी ५०० रुपये देण्याच्या मागणीवर ठाम आहे.

बॉन्डवर हमी देण्याची कारखानदारांची तयारी
गेल्या तीन महिन्यांत साखरेला प्रतिक्विंटल ४,१०० रुपये दर मिळाला आहे. या दरानुसार बँकांकडून साखरेच्या मूल्याच्या ८५ टक्के रक्कम उचल म्हणून मिळणार आहे. त्यातून कर्जाचे हप्ते, ऊसतोडणी, वाहतूक आणि इतर खर्च वजा केल्यानंतर किती रक्कम शिल्लक राहते, असा प्रश्न कारखानदारांनी उपस्थित केला आहे. साखरेचे दर यापुढेही स्थिर राहिल्यास अतिरिक्त २०० रुपये देण्याची हमी बॉन्डवर लिहून देण्याची तयारी कारखानदारांनी दर्शवल्याचे समजते.

शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत तोडगा निघाला नाही. त्यानंतर जिल्ह्यातील बहुतांश साखर कारखानदारांची स्वतंत्र बैठक झाली. या बैठकीत प्रतिटन ३,८०० रुपये पहिली उचल देण्यावर एकमत झाल्याचे समजते. भविष्यात साखरेचे दर स्थिर राहिल्यास अतिरिक्त २०० रुपये देण्याची तयारीही त्यांनी दर्शवली आहे.शेतकरी संघटनांनी प्रतिटन ४,५०० रुपये पहिली उचल मागितली असली, तरी ४,००० रुपये पहिली उचल आणि हंगाम संपण्यापूर्वी अतिरिक्त २०० रुपये स्वीकारण्याबाबत तडजोड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे आगामी दोन ते तीन दिवसांत दोन्ही बाजूंमध्ये सुवर्णमध्य काढण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे चित्र आहे.

राज्यातील अन्य भागांतील साखर कारखाने गाळप हंगाम सुरू करून कार्यरत झाले आहेत. मग केवळ कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांनाच लक्ष्य का केले जात आहे, असा सवाल कारखानदारांनी उपस्थित केल्याचे समजते. राज्यात सर्वाधिक दर देणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील कारखान्यांना अडचणीत का आणले जात आहे, असा प्रश्नही त्यांनी बैठकीत उपस्थित केल्याचे सांगितले जाते.पहिल्या उचलीच्या मुद्द्यावर शेतकरी संघटना आणि कारखानदार यांच्यातील संघर्ष कायम असल्याने गळीत हंगाम कधी सुरू होणार, याकडे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

Amaron






