
महायुतीचे १२ संचालक सभेला अनुपस्थित राहणार असल्याचे निश्चित असल्याने काँग्रेसचे संचालक कायदेशीर तयारीनिशी सभेला उपस्थित होते. सभा तहकूब होताच त्यांनी पाटील-चुयेकर यांच्या अध्यक्षपदी निवडीची मागणी केली. मात्र, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी ही मागणी अमान्य केली. त्यानंतर १३ संचालकांनी सभागृहातच निवड सभा घेत पाटील-चुयेकर यांची अध्यक्षपदी निवड केली. या निवडीबाबत बोलताना शशिकांत पाटील-चुयेकर म्हणाले, “बहुमताने माझी अध्यक्षपदी निवड झाली आहे. जिल्ह्यातील साडेपाच लाख दूध उत्पादकांच्या मनात होते, तेच आज घडले आहे. ही निवड कायदेशीर असून आजपासून माझे कामकाज सुरू झाले आहे. आगामी काळात गोकुळचे घटलेले दूध संकलन वाढविण्यासाठी प्रयत्न करणार आहे.”

तायशेटे सूचक, तर रेडेकर अनुमोदक
शशिकांत पाटील-चुयेकर यांच्या अध्यक्षपदाच्या निवडीसाठी संचालक अभिजीत तायशेटे सूचक होते, तर संचालिका अंजना रेडेकर यांनी अनुमोदन दिले. यावेळी प्रा. किसन चौगले, राजू आवळे, बाबासाहेब देवकर, बाबासाहेब चौगले, बयाजी शेळके, राहुल देसाई, विश्वजीत जाधव, विद्याधर गुरबे, शशिकांत खोत आणि भाग्यश्री डोंगळे हे संचालक उपस्थित होते.

दिवाळीपूर्वी पुन्हा सभा होण्याची शक्यता
गोकुळ दूध संघाची गुरुवारी तहकूब झालेली सभा दिवाळीपूर्वी होण्याची शक्यता आहे. अशासकीय संचालकांबाबत मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेऊन त्यासंदर्भातील राजपत्र तातडीने प्रसिद्ध करण्याच्या हालचाली महायुतीच्या पातळीवर सुरू असल्याचे समजते. मंगळवारी (दि. ३) याबाबत निर्णय होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सभेच्या गणपूर्तीवरून (कोरम) निर्माण झालेला पेच आगामी आठवड्यात सुटणार का, याकडे दूध उत्पादकांचे लक्ष लागले आहे.

पोटनियम काय सांगतात?
गोकुळच्या पोटनियमानुसार निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर १५ दिवसांच्या आत अध्यक्ष निवडीची सभा घेणे बंधनकारक आहे. ही मुदत २ नोव्हेंबरला संपत आहे. त्यामुळे अध्यक्ष निवडीच्या प्रक्रियेवरून कायदेशीर पेच निर्माण होण्याची शक्यता असून, याबाबत निवडणूक प्राधिकरण काय निर्णय घेते, याकडे लक्ष लागले आहे.

Hasan Mushrif
काँग्रेस नेत्याच्या जातीयवादी प्रचारामुळे मुलाचा पराभव : हसन मुश्रीफ
कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत धर्मनिरपेक्षतेचा आव आणणाऱ्या काँग्रेस नेत्यानेच जातीयवादी प्रचार केल्यामुळे आपल्या मुलाचा पराभव झाल्याचा आरोप वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला. गुरुवारी नंदुरबार येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही भूमिका मांडली. तीन पक्षांची आघाडी असूनही राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यातील मतभेद निवडणूक होईपर्यंत मिटले नाहीत. त्यामुळे महायुतीमध्ये एकसूत्रता राहिली नाही आणि त्याचा फटका निवडणुकीत बसला, अशी कबुलीही मुश्रीफ यांनी दिली. सतेज पाटील १४ संचालकांचा कोरम हा तांत्रिक मुद्दा असल्याचे म्हणत असतील, तर १३ संचालकांचे बहुमत हाही तांत्रिक मुद्दाच ठरतो, असे मुश्रीफ म्हणाले.निवडणुकीतील मतांची आकडेवारी मांडताना त्यांनी सांगितले की, महायुतीला सर्वसाधारण गटातील २० जागांसाठी ५३ हजार १४२ मते, तर राखीव गटातील पाच जागांसाठी ११ हजार ९७२ मते मिळाली. अशा प्रकारे महायुतीला एकूण ६५ हजार ११४ मते मिळाली. दुसरीकडे, समविचारी आघाडीला सर्वसाधारण गटात ४८ हजार ६३०, तर राखीव गटात १४ हजार ७०९ मते मिळाली. त्यामुळे एकूण मतांच्या आकडेवारीवरून सभासदांचा कौल कोणाच्या बाजूने होता, हे स्पष्ट होते, असा दावा त्यांनी केला.

‘शशिकांत पाटील-चुयेकर यांना आम्हीच अध्यक्ष करू’
गोकुळ दूध संघाच्या उभारणीत आनंदराव पाटील-चुयेकर यांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे त्यांच्या मुलाला, शशिकांत पाटील-चुयेकर यांना अध्यक्ष करण्याचे मागील अध्यक्ष निवडीच्या वेळीच ठरले होते. मात्र, महायुतीच्या दबावामुळे त्यांना अध्यक्ष करता आले नाही आणि त्यामुळेच आपला मुलगा नवीद अध्यक्ष झाला, असे मुश्रीफ यांनी स्पष्ट केले. शशिकांत पाटील-चुयेकर यांचे नाव दोन वेळा अध्यक्षपदासाठी चर्चेत आले, तरी त्यांना संधी मिळाली नाही. त्यामुळे आता त्यांना अध्यक्ष करण्याची जबाबदारी आम्हालाच पार पाडावी लागेल, असेही मुश्रीफ म्हणाले.

satej patil
‘तुमच्या मुलाला चेअरमन करताना मी जातीयवादी नव्हतो का?’ : सतेज पाटील
गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीत मुलगा नवीद मुश्रीफ यांच्या पराभवासाठी काँग्रेस नेत्याने जातीयवादी प्रचार केल्याचा आरोप वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी केला होता. या आरोपाला काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर दिले. “गोकुळच्या अध्यक्षपदासाठी नवीद मुश्रीफ यांचे नाव असलेले पाकीट मी स्वतः विश्वास पाटील यांच्याकडे दिले होते. त्यावेळी मी जातीयवादी नव्हतो का?” असा सवाल सतेज पाटील यांनी केला. कोल्हापूर जिल्ह्यात जातीयवाद केला जात नाही. त्यामुळे आपल्यावर जातीयवादी असल्याचा आरोप होणे दुर्दैवी आहे, असे ते म्हणाले. मुश्रीफ यांना ज्यांनी त्रास दिला, त्यांच्याबाबत ते बोलत नाहीत. त्यांच्या मुलाचा पराभव कोणी घडवून आणला, हेही त्यांना माहिती असल्याचा टोला पाटील यांनी लगावला.

‘माझा मुलगा अध्यक्ष होणार नव्हता’
महायुतीच्या १२ संचालकांपैकी काही जण सभेला उपस्थित राहण्यास तयार होते. मात्र, त्यांचा नेत्यांशी चर्चा करण्याचा आग्रह होता. त्यानुसार आपण कोणताही अहंकार न ठेवता चर्चा केली; परंतु त्यांच्याकडून काहीही प्रतिसाद मिळाला नाही, असे सतेज पाटील यांनी सांगितले. “संचालकांना विनंती करण्यामागे शेतकऱ्यांप्रती असलेली माझी तळमळ होती. गोकुळचा अध्यक्ष माझा मुलगा होणार नव्हता,” असे सांगत त्यांनी मुश्रीफ यांना प्रत्युत्तर दिले.

‘सहकारातील काळा दिवस’
सभेच्या गणपूर्तीसाठी कोरम आवश्यक असतो; मात्र निवड प्रक्रियेसाठी त्याचा वेगळा विचार केला पाहिजे, अशी भूमिका सतेज पाटील यांनी मांडली. गुरुवारी कोरमचा मुद्दा उपस्थित करून सभा तहकूब करणे हा सहकार क्षेत्रातील काळा दिवस असल्याची टीकाही त्यांनी केली.
प्रशासकांच्या काळात २४ कोटींचा तोटा झाल्याचा दावा
गोकुळवर प्रशासक असताना दूध संकलनात घट झाली असून संघाला २४ कोटी रुपयांचा तोटा झाल्याचा दावा सतेज पाटील यांनी केला. आणखी काही दिवस प्रशासक राहिल्यास परिस्थिती काय होईल, असा सवाल करत सत्ताधाऱ्यांना गोकुळ दूध संघ बंद पाडायचा आहे, असा आरोपही त्यांनी केला.

Amaron






