कोल्हापूर : शहर आणि परिसरात एमडी ड्रग्जची विक्री करणाऱ्या दोन सराईत संशयितांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. जयंती नाला परिसरात सापळा रचून पोलिसांनी ही कारवाई केली. सॅम्युअल दीपक पवार (वय २२, रा. ई. पी. स्कूल कंपाऊंडजवळ, कनाननगर) आणि आदित्य अनिल कस्तुरे (वय २४, रा. बेकर गल्ली, शाहूपुरी) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून २० ग्रॅम एमडी ड्रग्ज, मोबाईल फोन आणि दुचाकी असा सुमारे दोन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

जिल्ह्यात अमली पदार्थांचा साठा आणि विक्रीविरोधात कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी दिल्या आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक अमली पदार्थ विक्रेत्यांवर लक्ष ठेवून होते. दरम्यान, जयंती नाला परिसरात दोन तरुण एमडी ड्रग्ज विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी सोमवारी सायंकाळी परिसरात सापळा रचला. संशयित दोघे तेथे आल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.

अंगझडतीमध्ये त्यांच्याकडून २० ग्रॅम एमडी ड्रग्ज आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी त्यांचे मोबाईल फोन आणि दुचाकीही जप्त केली. ही कारवाई पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण आणि शाहूपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सीमा शेळके, पोलिस अंमलदार अशोक पोवार, सत्यजित तानुगडे, अरविंद पाटील आणि रत्नदीप जाधव यांच्या पथकाने केली.

सॅम्युअलविरोधात यापूर्वीही गुन्हे
पोलिसांच्या माहितीनुसार, संशयित सॅम्युअल पवार याच्याविरोधात यापूर्वी अमली पदार्थांची विक्री आणि हाणामारीचे गुन्हे दाखल आहेत. पुन्हा अमली पदार्थ तस्करीत त्याचा सहभाग आढळल्याने पोलिस त्याची सखोल चौकशी करीत आहेत. चौकशीदरम्यान त्याने हे अमली पदार्थ कोल्हापुरातील काही गुन्हेगारांकडून खरेदी केल्याची माहिती दिल्याचे पोलिसांनी सांगितले. सॅम्युअल पवार आणि आदित्य कस्तुरे हे दोघे महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच उच्चभ्रू कुटुंबातील तरुणांना अमली पदार्थ विक्री करीत असल्याचा पोलिसांचा संशय असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.






