मुंबई : महाराष्ट्राची लोकपरंपरा, ग्रामीण जीवन आणि मानवी संघर्षाचे चित्रण करणाऱ्या ‘गोंधळ’ या मराठी चित्रपटाने ऑस्करच्या शर्यतीत प्रवेश केला आहे. संतोष डावखर लिखित-दिग्दर्शित या चित्रपटाची २०२७ मध्ये होणाऱ्या ९९व्या ऑस्कर पुरस्कारांसाठी भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड करण्यात आली आहे. ‘बेस्ट इंटरनॅशनल फीचर फिल्म’ या विभागासाठी देशभरातील ३३ चित्रपटांमधून ‘गोंधळ’ची निवड करण्यात आली. फिल्म फेडरेशन ऑफ इंडियाने शुक्रवारी याबाबत घोषणा केली.

३३ चित्रपटांमधून ‘गोंधळ’ची निवड
एफएफआयच्या निवड समितीचे अध्यक्ष पी. शेषाद्री यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा समितीने विविध भारतीय भाषांमधील ३३ चित्रपटांचे परीक्षण केले. यामध्ये चार मराठी आणि १४ हिंदी चित्रपटांचा समावेश होता. अंतिम फेरीत ‘गोंधळ’, ‘अंध’ आणि ‘इक्कीस’ या चित्रपटांचा समावेश होता.

लोकपरंपरेभोवती फिरणारी कथा
‘गोंधळ’ हा ग्रामीण महाराष्ट्राच्या पार्श्वभूमीवर आधारित असून, एका रात्रीत घडणारी त्याची कथा पारंपरिक ‘गोंधळ’ विधीभोवती फिरते. सुमन नावाची महिला वैवाहिक आयुष्यात अडकलेली आहे. ती प्रियकराच्या मदतीने पतीच्या हत्येचा कट रचते. या घटनेतून प्रेम, फसवणूक, श्रद्धा आणि मानवी नात्यांमधील संघर्ष उलगडत जातो.

सहा महिन्यांचा रोडमॅप तयार
भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून निवड झाल्यानंतर आता ऑस्करच्या पुढील प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. याबाबत संतोष डावखर म्हणाले, “‘गोंधळ’ हा मराठी मातीतला आणि लोकपरंपरा दाखविणारा चित्रपट आहे. भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा बहुमान मिळाल्याने भारतीय आणि मराठी माणूस म्हणून मला खूप अभिमान वाटतो. ऑस्कर मिळविण्यासाठी सहा महिन्यांचा रोडमॅप तयार केला आहे. यासाठी परदेशातील ३० ते ३५ जणांच्या टीमचे सहकार्य घेणार आहोत.”

‘सिल्व्हर पीकॉक’ पुरस्कारानेही गौरव
‘गोंधळ’चा वर्ल्ड प्रीमियर २०२५ मध्ये गोव्यात झालेल्या ५६व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात झाला होता. या महोत्सवात संतोष डावखर यांना सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा ‘सिल्व्हर पीकॉक’ पुरस्कार मिळाला होता.

अंतिम ऑस्कर नामांकन अद्याप बाकी
‘गोंधळ’ची भारताची अधिकृत प्रवेशिका म्हणून झालेली निवड ही अंतिम ऑस्कर नामांकन नसून पुढील प्रक्रियेची सुरुवात आहे. आता हा चित्रपट ऑस्करच्या ‘इंटरनॅशनल फीचर फिल्म’ प्रक्रियेत सहभागी होईल. त्यानंतर शॉर्टलिस्ट आणि अंतिम नामांकनाची प्रक्रिया पार पडणार आहे.

११ वर्षांनंतर पुन्हा मराठी चित्रपटाला संधी
अकरा वर्षांपूर्वी ‘कोर्ट’ या मराठी चित्रपटाची भारताची अधिकृत ऑस्कर प्रवेशिका म्हणून निवड झाली होती. त्यानंतर आता ‘गोंधळ’च्या माध्यमातून पुन्हा एकदा मराठी चित्रपटाला भारताचे प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. या निवडीबद्दल भावना व्यक्त करताना संतोष डावखर यांनी, “माझी ऑलिम्पिकमध्ये निवड झाली आहे, असे वाटत आहे,” अशी प्रतिक्रिया दिली.







