
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी ही घटना घडली. कोलोनमधील Hohenzollernring परिसरातील एका फास्ट-फूड रेस्टॉरंटबाहेर १६ वर्षीय मुलगी तिच्या मित्रांसोबत उभी होती. त्यावेळी सुमारे १.२ मीटर उंचीचा लाल आणि सोनेरी रंगाचा रोबोट मागून तिच्याजवळ आला. त्याने मुलीला अयोग्य पद्धतीने स्पर्श केल्याचा आणि आक्षेपार्ह हालचाली केल्याचा आरोप आहे. या घटनेच्या वेळी रोबोटचा १६ वर्षीय मालक आणि त्याचा १९ वर्षीय साथीदार उपस्थित होते. त्यांनी संपूर्ण प्रकाराचे चित्रीकरण केले, सोशल मीडियावर त्याचे थेट प्रक्षेपण केले आणि त्यावर आक्षेपार्ह टिप्पण्याही केल्याचे पोलिसांनी सांगितले.

कारच्या डिकीत लपवलेला रोबोट आढळला
घटनेची माहिती मिळताच कोलोन पोलिसांनी तपास सुरू केला. मॅग्नसस्ट्रासे आणि होहेनझोलर्नरिंगच्या छेदनबिंदूजवळ पोलिसांनी संशयितांचा शोध घेतला. यावेळी एका फोक्सवॅगन कारच्या डिकीत रोबोट लपवून ठेवल्याचे आढळले. पोलिसांच्या माहितीनुसार, वेगबर्ग येथील रहिवासी असलेल्या १६ वर्षीय मुलाने पोलिस घटनास्थळी पोहोचण्यापूर्वीच रोबोट कारच्या डिकीत लपवला होता. तपासासाठी पोलिसांनी रोबोटसह संशयितांचे दोन मोबाईल फोन जप्त केले आहेत.

रोबोटचे नियंत्रण कोणी केले? पोलिसांकडून तपास
या रोबोटच्या हालचाली रिमोट कंट्रोलद्वारे नियंत्रित केल्या जात होत्या का, याचा तपास पोलिस करत आहेत. रोबोटने केलेल्या हालचालींमागे कोणाचा हेतुपुरस्सर हस्तक्षेप होता का, हेदेखील तपासले जात आहे.कोलोन पोलिसांच्या म्हणण्यानुसार, गुन्हे अन्वेषण विभाग या घटनेचा सविस्तर तपास करत आहे. रोबोटच्या कार्यपद्धतीची तपासणी करून त्याच्या हालचालींवर कोणीतरी जाणूनबुजून नियंत्रण ठेवले होते का, हे निश्चित केले जाणार आहे. या प्रकरणात लैंगिक छळाच्या संशयावरून पुढील तपास सुरू असून, संबंधितांवर कोणते गुन्हे दाखल होऊ शकतात, याबाबत पोलीस पुराव्यांच्या आधारे निर्णय घेणार आहेत.

Amaron





