कोल्हापूर : शेतजमिनीच्या वादातून झालेल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या यशवंत गोपाळ खोत (रा. चांदेकरवाडी, ता. राधानगरी) यांचा गुरुवारी रात्री अकराच्या सुमारास कोल्हापुरातील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. दिवाळीच्या सणातच घडलेल्या या खुनाच्या घटनेमुळे चांदेकरवाडी परिसरात शोककळा पसरली आहे. याप्रकरणी राधानगरी पोलिसांनी शिवाजी महादेव खोत, रितेश शिवाजी खोत आणि वैशाली शिवाजी खोत या तिघांना अटक केली आहे.

पोलिसांत दाखल फिर्यादीनुसार, यशवंत खोत आणि संशयित आरोपी यांच्यात शेतजमिनीच्या कारणावरून पूर्वीपासून वाद होता. ४ नोव्हेंबर रोजी रात्री तसेच ५ नोव्हेंबर रोजी सकाळी सव्वासहाच्या सुमारास आंबिका गल्लीतील आरोपींच्या घरासमोर पुन्हा वाद उफाळून आला. यावेळी आरोपींनी यशवंत खोत यांना काठ्यांनी बेदम मारहाण केली. वडिलांना वाचवण्यासाठी गेलेल्या सचिन यशवंत खोत (वय ४३) यांनाही मारहाण करण्यात आली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या यशवंत खोत यांना प्रथम कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच गुरुवारी रात्री त्यांची प्राणज्योत मालवली.

दिवाळीच्या सणात गावावर शोककळा
चांदेकरवाडीच्या इतिहासात शेतजमिनीच्या वादातून खुनाची घटना घडण्याची ही पहिलीच वेळ असल्याचे सांगण्यात येत आहे. दिवाळीच्या आनंदोत्सवात घडलेल्या या रक्तरंजित घटनेमुळे गावातील वातावरण शोकाकुल झाले आहे. जमिनीच्या वादातून एका व्यक्तीला जीव गमवावा लागल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी प्रणील गिलडा, पोलिस निरीक्षक अजित सिद आणि पोलिस उपनिरीक्षक निवृत्ती खोत यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. फॉरेन्सिक लॅबच्या पथकानेही घटनास्थळावरून आवश्यक पुरावे संकलित केले. यावेळी पोलिस कॉन्स्टेबल शहाजी भोसले, प्रतिराज भोपळे आणि विश्वास पाटील उपस्थित होते. यशवंत खोत यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, विवाहित मुलगी, सून आणि नातवंडे असा परिवार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास राधानगरी पोलिस करीत आहेत.







