कोल्हापूर : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी कोल्हापूर पोलिसांनी सराईत गुन्हेगारांविरोधात कडक भूमिका घेतली आहे. शहरासह करवीर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तब्बल २६२ सराईत गुंडांची शनिवारी पोलिसांनी हजेरी घेतली. यावेळी पोलिस अधिकाऱ्यांनी गुन्हेगारांना स्पष्ट शब्दांत इशारा देत गैरप्रकार केल्यास थेट कारवाई करण्याचे बजावले. शहर पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील आणि करवीर पोलीस उपअधीक्षक आप्पासो पवार यांनी सराईत गुन्हेगारांना समज दिली. वर्चस्व निर्माण करण्यासाठी सोशल मीडियावर आवाहन-प्रतिआव्हान देणारे रिल्स किंवा आक्षेपार्ह पोस्ट टाकल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.

Amaron
शाहूपुरीत ९०, तर करवीरमध्ये १७२ गुंडांची हजेरी
शनिवारी दुपारी शहरातील ९० सराईत गुन्हेगारांची शाहूपुरी पोलीस ठाण्यात हजेरी घेण्यात आली. यावेळी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, संतोष डोके, श्रीराम कन्हेरकर, किरण लोंढे आणि विकास जाधव उपस्थित होते. तर करवीर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील १७२ गुंडांची हजेरी घेण्यात आली. यावेळी करवीर पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, पोलीस निरीक्षक किशोर शिंदे, कागलचे अजित जाधव, शिरोली एमआयडीसीचे सहायक निरीक्षक सुनील गायकवाड, गोकुळ शिरगाव पोलीस ठाण्याचे रणजित पाटील आणि इस्पुर्लीचे अभिजित पाटील उपस्थित होते.

‘समज देऊनही वर्तन बदलले नाही तर थेट कारवाई’
गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे. प्रत्येकाच्या घरात हा सण उत्साहात साजरा केला जातो. मात्र, वारंवार सूचना देऊनही काही सराईत गुन्हेगारांच्या वर्तनात बदल होत नसल्याचे पोलिसांनी सांगितले. “यापुढे केवळ समज देऊन उपयोग होणार नाही. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर थेट कारवाई केली जाईल,” असा स्पष्ट इशारा शहर पोलीस उपअधीक्षक प्रिया पाटील यांनी दिला. सोशल मीडियावर वर्चस्ववादातून आवाहन-प्रतिआव्हान करणारे रिल्स टाकून वातावरण बिघडविण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवरही पोलिसांची नजर राहणार आहे. अशा प्रकारचे व्हिडीओ प्रसारित करणाऱ्यांना त्यांच्याच सोशल मीडिया अकाउंटवरून माफी मागण्यास भाग पाडले जाईल, असा इशाराही पोलिसांनी दिला.

आक्षेपार्ह पोस्टवर पोलिसांची करडी नजर
गणेशोत्सव काळात दोन समाजांमध्ये तेढ निर्माण होईल, अशा कोणत्याही आक्षेपार्ह पोस्ट सोशल मीडियावर प्रसारित करू नयेत, असे करवीरचे पोलीस उपअधीक्षक आप्पासो पवार यांनी सांगितले. सणाच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा-सुव्यवस्था कायम राहावी, यासाठी पोलिस प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेतली जात आहे. सोशल मीडियावरील आक्षेपार्ह पोस्ट, चिथावणीखोर मजकूर किंवा व्हिडीओ आढळल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.







