चंदीगड : चंदीगडमधून कथितरित्या अपहरण करून मोरिंडा येथे जिवंत जाळण्यात आलेली २८ वर्षीय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मनजीत कौर सात आठवड्यांची गर्भवती होती, अशी माहिती चंदीगड पोलिसांनी दिली आहे. उपचारादरम्यान २६ ऑगस्ट रोजी पीजीआयएमईआर रुग्णालयात तिचा मृत्यू झाला. पोलिसांच्या माहितीनुसार, मनजीत कौर घटस्फोटित होती. तिला सात वर्षांचा मुलगा असून तो तिच्या माजी पतीसोबत राहत होता. या प्रकरणाचा विविध अंगांनी तपास सुरू असला, तरी अंत्यसंस्काराची प्रक्रिया सुरू असल्याने सध्या पीडितेच्या कुटुंबीयांनी तपासात सहभाग घेतलेला नाही. दरम्यान, चंदीगड पोलिसांनी एफआयआरमध्ये आरोपी म्हणून नमूद केलेल्या शुभी आणि पिंडा या दोघांचा शोध घेऊन त्यांना अटक करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. मनजीत कौरच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून दोघांविरुद्ध अपहरण आणि खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Ujwal
नेमके काय घडले?
पोलिसांच्या माहितीनुसार, ३ जुलै रोजी आरोपींनी मनजीत कौरला जबरदस्तीने कारमध्ये बसवले आणि चंदीगडहून मोरिंडा येथे नेले. तेथे तिच्यावर हल्ला करून तिला एका तुतीच्या झाडाला बांधण्यात आले आणि त्यानंतर तिला पेटवून देण्यात आले, असा आरोप आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर मनजीत कौरचा एक मित्र घटनास्थळी पोहोचला. त्याने ब्लँकेटच्या मदतीने आग विझवली आणि तिला तातडीने मोरिंडा येथील स्थानिक रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर तिला मोहाली येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. ९ जुलै रोजी तिला पीजीआयएमईआरमध्ये दाखल करण्यात आले. दीर्घकाळ मृत्यूशी झुंज देणाऱ्या मनजीत कौरने ५ ऑगस्ट रोजी काही काळ शुद्धीवर येण्याची चिन्हे दाखवली होती. मात्र, गंभीर दुखापतींमुळे अखेर २६ ऑगस्ट रोजी तिचा मृत्यू झाला.

अपहरणामागचे कारण शोधण्याचा पोलिसांचा प्रयत्न
मनजीत कौरचे अपहरण नेमके कोणत्या परिस्थितीत झाले आणि या गुन्ह्यामागील हेतू काय होता, याचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. शुभी आणि पिंडा यांची या गुन्ह्यातील नेमकी भूमिका निश्चित करण्याचेही प्रयत्न सुरू आहेत. तपासाचा भाग म्हणून पोलिसांनी चंदीगड ते मोरिंडा या मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. तसेच मनजीत कौरच्या परिचितांची चौकशी करून घटनेपूर्वी आणि घटनेनंतर नेमका काय घटनाक्रम घडला, याचा शोध घेतला जात आहे.






