कोल्हापूर : महागडा मोबाइल घेण्यासाठी आणि चैनीच्या वस्तूंवर खर्च करण्यासाठी पैशांची गरज असल्याने मुलानेच घरातील सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रकमेवर डल्ला मारल्याचा प्रकार शिंगणापूर येथे उघडकीस आला. चोरी झाल्याचा बनाव करून कुटुंबीयांना माहिती देणाऱ्या तरुणाला स्थानिक गुन्हे अन्वेषण (एलसीबी) पथकाने चोरीचा मुद्देमाल विक्रीसाठी घेऊन जात असताना ताब्यात घेतले. यश सुनील बंडगर (वय २१, रा. शाकंभरी कॉलनी, शिंगणापूर) असे संशयिताचे नाव आहे. शाकंभरी कॉलनीतील सुनील बंडगर यांच्या घरात सोमवारी रात्री चोरी झाली होती. कुटुंबीय झोपल्यानंतर अज्ञात व्यक्तीने घरातील सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा १० लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची तक्रार करवीर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. या प्रकरणाचा एलसीबी पथकाकडून समांतर तपास सुरू होता.

तपासादरम्यान पोलिसांना घरातीलच व्यक्तीचा चोरीत सहभाग असण्याची शक्यता वाटली. त्यानुसार कुटुंबातील सदस्यांची चौकशी करण्यात आली. यावेळी यश बंडगर याच्या जबाबातील काही बाबींमध्ये विसंगती आढळून आली. यश शिक्षण घेत असून महागडा मोबाइल घेण्यासाठी तसेच चैनीसाठी तो पालकांकडे पैशांची मागणी करीत असल्याची माहितीही पोलिसांना मिळाली. पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली तपास सुरू होता. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करून घरातील परिस्थितीची माहिती घेतली. चोरीच्या वेळी यशच्या हालचाली संशयास्पद आढळल्याने पोलिस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांनी त्याच्यावर लक्ष ठेवले.

दरम्यान, लक्षतीर्थ वसाहतीकडून शिंगणापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर किडकाडी मंदिराजवळ पोलिसांनी सापळा रचला. चोरीचा मुद्देमाल विक्रीसाठी घेऊन जात असल्याच्या संशयावरून यश बंडगर याला ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी त्याची झडती घेतली असता त्याच्याकडे चोरीस गेलेले सोन्याचे दागिने आणि इतर मुद्देमाल असा एकूण १० लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले. चौकशीदरम्यान घरातील चोरीबाबत त्याने माहिती दिल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.






