कोल्हापूर : गेल्या तीन वर्षांपासून स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाने राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी दऱ्याचे वडगाव येथे उघडकीस आली. सुशांत सुनील बल्लाळ असे मृत तरुणाचे नाव आहे. एकुलत्या मुलाच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे. सुशांतने मोरेवाडी परिसरातील एका महाविद्यालयातून सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी घेतली होती. त्याची बहीणही पदवीधर असून, दोघेही स्पर्धा परीक्षांची तयारी करत होते. सुशांतने शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे फिरून आल्यानंतर घराच्या दुसऱ्या मजल्यावर जाऊन आत्महत्या केली.

Amaron
नाश्त्यासाठी सुशांतला बोलविण्यासाठी कुटुंबीय गेले असता त्याने कोणताही प्रतिसाद दिला नाही. बराच वेळ दरवाजा न उघडल्याने कुटुंबीयांनी ही बाब वडिलांना सांगितली. त्यानंतर परिसरातील नागरिकांच्या मदतीने दरवाज्याचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला असता सुशांतने आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. सुशांतचे वडील एका खासगी हायस्कूलमध्ये शिक्षक आहेत. सुशांत अभ्यासात हुशार होता. त्याने राज्य लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा एकदा उत्तीर्ण केली होती. अभ्यास आणि व्यायामाचे त्याचे दररोज ठराविक नियोजन होते.

दरम्यान, सुशांतच्या आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली. घटनास्थळी त्याच्या खिशात कोणतीही चिठ्ठी आढळून आलेली नाही. पोलिसांनी त्याचा मोबाइल ताब्यात घेतला असून, त्याने शेवटचा फोन कोणाला केला होता किंवा अलीकडे कोणाशी काही संभाषण झाले होते का, याचा तपास सुरू केला आहे.







