कोल्हापूर : हरिओमनगर परिसरातील जमीन मिळकतीच्या विकासाचे काम सुरू ठेवण्यासाठी १० लाख रुपयांची खंडणी मागून जिवे मारण्याची धमकी दिल्याच्या प्रकरणात उद्धवसेनेचे माजी जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांच्या शोधासाठी जुना राजवाडा पोलिसांची दोन पथके रवाना झाली आहेत. इंगवले यांना लवकरच अटक होण्याची शक्यता असल्याची माहिती जुना राजवाडा पोलिस ठाण्याचे निरीक्षक किरण लोंढे यांनी रविवारी दिली.

या प्रकरणी गडहिंग्लज येथील खुतबुद्दीन गैबिसो शेख यांनी फिर्याद दाखल केली आहे. या गुन्ह्यातील संशयित राकेश माने (सणगर तालीमजवळ, मंगळवार पेठ) आणि सुमीत ऊर्फ सोन्या चौगुले (फिरंगाई तालीमजवळ, कोल्हापूर) या दोघांना शनिवारी रात्री पोलिसांनी अटक केली. रविवारी त्यांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. या प्रकरणात फारुक बाबू खान (सोनटक्के तालीमजवळ, लक्ष्मीपुरी), अनंत माळवी-पाटील (हनुमाननगर, आयटीआयजवळ, कोल्हापूर) यांच्यासह अन्य दोन अनोळखी व्यक्तींवरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दहा लाखांची मागणी, साडेचार लाख रुपये दिल्याचा दावा
पोलिसांच्या माहितीनुसार, शेख यांनी हरिओमनगर परिसरातील सुमारे आठ एकर जागा विकासासाठी घेतली आहे. ऑगस्ट २०२५ मध्ये शेख तेथे उपस्थित असताना फारुक खान, अनंत माळवी-पाटील यांच्यासह पाचजण तेथे आले. त्यांनी काम सुरू ठेवायचे असल्यास रविकिरण इंगवले यांचे नाव सांगत १० लाख रुपयांची मागणी केली, असा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. यावेळी शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याने शेख यांनी खान याच्याकडे ४ लाख ५० हजार रुपये दिल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

दुसऱ्या प्रकरणात इंगवले यांचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज
दरम्यान, तरुणाला मारहाण करून त्याच्या पत्नीला कार्यालयात बोलावून शिवीगाळ केल्याच्या दुसऱ्या एका प्रकरणात रविकिरण इंगवले यांच्यासह सात जणांविरोधात गुन्हा दाखल आहे. या प्रकरणात अटकपूर्व जामिनासाठी इंगवले यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.







