नऊ लाख घेतले, २६ लाख परत केले; तरीही २५ लाखांची मागणी
कोल्हापूर : खासगी सावकाराकडून नऊ लाख रुपये घेतल्यानंतर तब्बल २६ लाख रुपये परत करूनही पुन्हा २५ लाख रुपयांची मागणी होत असल्याने मानसिक त्रासाला कंटाळून एका व्यक्तीने विषारी तणनाशक प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कागल तालुक्यातील सोनगे येथे घडली. श्रीधर दत्तात्रय डावरे (वय ४८, रा. सोनगे, ता. कागल) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी त्यांच्या पत्नी सविता श्रीधर डावरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून निवास आण्णासो पाटील (रा. बाणगे, ता. कागल) याच्याविरोधात मुरगूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निवास पाटील हा खासगी सावकारी करत असल्याचे तक्रारीत नमूद आहे. श्रीधर डावरे यांनी त्याच्याकडून व्याजाने नऊ लाख रुपये घेतले होते. या रकमेपोटी त्यांनी आतापर्यंत तब्बल २६ लाख रुपये परत केले होते. मात्र, त्यानंतरही आणखी २५ लाख रुपये देण्याची मागणी केली जात होती. या पैशांवरून डावरे यांना मारहाण तसेच धमक्या दिल्याचा आरोप पत्नीने तक्रारीत केला आहे.

या सततच्या तगाद्यामुळे आणि मानसिक त्रासामुळे श्रीधर डावरे यांनी बुधवारी (२३ सप्टेंबर) पत्नी सविता यांना भावनिक मेसेज पाठवला. या मेसेजमध्ये त्यांनी, “सविता, तू माझ्यासाठी भरपूर केलंस; पण मी काही करू शकलो नाही. मला माफ कर. मी माझ्या समूजवळ जातो. तू शंभोला फुलासारखं सांभाळ,” असे म्हटले होते. तसेच, “माझ्या खिशात चिठ्ठी ठेवली आहे. मला आता सहन होईना झालं,” असेही त्यांनी मेसेजमध्ये नमूद केले होते. यासोबतच खिशात ठेवलेल्या चिठ्ठीचे दोन फोटोही त्यांनी पत्नीला पाठवले. यानंतर श्रीधर डावरे यांनी विषारी तणनाशक प्राशन केले.

त्यांना उपचारासाठी प्रथम निपाणी येथील डॉ. अरुण पाटील यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान २६ सप्टेंबर रोजी त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर सविता डावरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून निवास पाटील याच्याविरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, मुरगूड पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.






